ते सध्या काय करतात?

ते सध्या काय करतात?

रॅकोल्डचे तीन कर्मचारी मला चिंचवड येथील अरविंद श्रौती यांच्या कार्यालयात भेटले. मी त्यांना आधी भेटलो होतो त्यामुळे भेटीत आपुलकी होती. त्यांनी रॅकोल्डवरील माझे ब्लॉगपोस्ट वाचले होते. मी अनेकदा सतीश येन्दे यांच्याशी संवाद साधला होता; ते एआयटीयूसीशी संलग्न असलेल्या पुणे कर्मचारी संघटनेच्या रॅकोल्ड युनिटचे सरचिटणीस होते.

सतीश हा एक मनमिळाऊ व्यक्ती होता जो कामगार संघटनेच्या नेत्याच्या सर्वमान्य प्रतिमेत बसत नव्हता. तो आक्रमक नव्हता आणि कोणत्याही समस्येवर तोडगा काढायचा.

रॅकोल्डने नोव्हेंबर २०१८ मध्ये अचानक आणि कोणत्याही सूचना न देता चाकण येथील त्यांचा प्लांट बंद केला आणि सर्व कर्मचाऱ्यांप्रमाणे सतीशलाही नोकरी गमवावी लागली. दुर्दैवाने, जून २०२१ मध्ये कोरोना साथीच्या काळात सतीशचा अकाली मृत्यू झाला.

‘त्याच्या आयुष्याची अखेर फारच लवकर आली, तसा तो तरुण होता,’ मी निरीक्षण केले, ‘वयाने तो चाळीशीचा असावा’

‘हो, तो एकेचाळीस वर्षांचा होता. कोरोना त्याला घेऊन गेला. अनेक जण साथीच्या आजारातून वाचले आहेत, पण तो तगला नाही.’

‘असं म्हणतात की लोक आजाराने मरत नाहीत; जगण्याची उमेद आणि आशा गमावल्यावर ते जग सोडून जातात.’

‘अस्सं? अरे! त्याच्या कुटुंबाचे काय झालं?’

‘तो त्याची पत्नी आणि दोन लहान मुली मागे सोडून गेला.’

‘अरेरे’

‘नोकरी गेल्यावर सतीशने उदर-निर्वाहासाठी काय केले?’

‘त्याने एका मित्रासोबत मिळून गाडी खरेदी केली आणि ते ओला आणि उबरसाठी १२ तासांच्या शिफ्टमध्ये ती चालवायचे’

‘हो, १२ तासांच्या शिफ्टमध्ये. आम्हाला जास्त उत्पन्न मिळत नाही.’ तिघांतला एक म्हणाला.

‘साहेब, हा ओला आणि उबरसाठी त्याची गाडी चालवतो.’

‘सुमारे एक हजार रुपये कमवण्यासाठी आपल्याला किमान १२ तास काम करावे लागेल. आणि देखभालीचा खर्च भागवण्यासाठी आपल्याला दिवसाला किमान तीनशे रुपये बाजूला ठेवावे लागतील.’

‘ही (बेकारीची) परिस्थिती विनाकारण आमच्यावर लादली गेली. रॅकोल्ड व्यवस्थापनाने आमच्याशी खेळ खेळला आणि त्या खेळाचे किती काळजीपूर्वक नियोजन केले गेले आणि अंमलबजावणी केली गेली हे आम्हाला समजायला बराच वेळ लागला.’

‘त्यांनी आम्हाला सांगितले की तंत्रज्ञानात बदल झाला आहे ज्यामुळे त्यांना कंपनीत कांही बदल करण्याशिवाय गत्यंतर नाही. त्यांनी आमच्या पंचवीस सदस्यांना ५० लाख रुपयांचा स्वेच्छा निवृत्तीचा लाभ दिला जेणेकरून ते कामगार संख्या शंभरच्या खाली आणू शकतील. परिणामी त्यांनी आमची  संघटना तोडली. जर एका वर्षापेक्षा जास्त काळ शंभराहून कमी कामगार संख्या असेल तर युनिट बंद करण्यासाठी तुम्हाला सरकारची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही, असे कायदा सांगतो. रॅकोल्डने ते हेरून नोव्हेंबर २०१८ मध्ये अचानक युनिट बंद केले.’

‘जर त्यांनी आमच्या पंचवीस सहकाऱ्यांना जे आर्थिक फायदे दिले तेच आम्हालाही दिले असते तर आम्हीही सेवानिवृत्ती स्वीकारली असती. पन्नास लाख! कदाचित आम्ही वाटाघातीत थोडे नमतेही घेतले असते. दिवाळीच्या दिवशी जेव्हा आम्हाला चार दिवसांची सुट्टी होती, तेव्हा त्यांनी आम्हाला मिठाई दिली, नोटीस-पे सह क्लोजर भरपाई आमच्या बँक खात्यात जमा केली आणि टपालाद्वारे कामावरून काढून टाकल्याचे पत्र पाठवले.’

‘दिवाळी सणाची खरेदी करत असताना अनेक कर्मचाऱ्यांना हे पत्र मिळाले. कित्येकांनी मिठाईचा डबा फेकून दिला. आमच्यासाठी हा कंपनीने केलेला मोठा विश्वासघात होता. ते व्यवस्थापकांना कर्मचाऱ्यांविरुद्ध आणि न्याय्यतेच्या मूल्यांविरुद्ध वागण्याचे प्रशिक्षण देतात का?’

‘ही एक धूर्त आणि हुशार चाल होती. अचानक कारखाना बंद करण्याच्या एक वर्ष आधी म्हणजे २०१७ साली आमच्यासोबत आमचा पगार १३७०० रुपये वाढवण्याचा करार केला. ते बंद करण्याच्या दिशेने पाऊल होते की व्यवसाय चालवण्याच्या दिशेने?’

खोलवरचा वैर आणि विश्वासघाताची भावना स्पष्ट दिसत होती. रॅकोल्ड एका इटालियन कंपनीचा भाग आहे. इटालियन कंपनीला युनियनने केलेल्या निवेदनांवर पाणी फेरले गेले – ‘आम्ही देशाच्या कायद्यानुसार काम करू’ असे त्यांचे उत्तर होते. कांही कृती कायदेशीर असू शकतात आणि कांही कृती न्याय्य असू शकतात. परंतु प्रत्येक कायदेशीर कृती न्याय्य (justified) नसते.

‘कर्मचाऱ्यांचे वयोगट काय होते?’ मी विचारले. विशेषतः मध्यमवयीन लोकांसाठी नोकरी गमावल्याचे संकट भयंकर असते. नोकरी जाण्याचे संकट तसे सर्वांसाठीच भयंकर असते, परंतु जर कोणी निवृत्तीच्या जवळ असेल तर त्याचा दुष्परिणाम तुलनेने कमी असतो.

‘जवळजवळ सर्वच आम्ही ४२-४५ वर्षे वयोगटातील होतो. आमची मुले शाळेत होती, काही दहावी किंवा बारावीच्या जवळ होती किंवा शिकत होती. ही वर्षे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीतील महत्त्वाची असतात आणि त्यामुळे त्यांचे भविष्यही घडते. पालकांना त्यांच्या मुलांचे भविष्य उद्ध्वस्त होताना पाहून खूप वाईट वाटते.’

‘मुलांचे भविष्य उद्ध्वस्त केले म्हणालात का?’

‘मग ते दुसरे आणखी काय होते, साहेब?’

‘आमच्यापैकी एकाने त्याच्या मुलीला एका चांगल्या शाळेत घातले होते. नोकरी गेल्यावर त्याला तिला जिल्हा परिषद शाळेत घालण्याशिवाय पर्याय नव्हता. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाच्या गुणवत्तेबद्दल जितके कमी बोलले तितके चांगले.’

‘हा एक प्रचंड मोठा फटका आहे.’

‘हो, खरंच. आणि त्या फटक्याचा आघात सोसत जगणे कठीण आहे. केवळ आमच्यासाठीच नाही तर आमच्या कुटुंबासाठीही. आम्ही आमच्या मुलांना आमच्या बेरोजगारीच्या आघातापासून वाचवू पहातो, पण त्यांना त्यापासून वाचवणे शक्य नाही. आणि आम्हाला हे वास्तव सतत खुपते.’

‘मुलांना त्यांच्या पालकांचा ताण आणि तणाव जाणवतो. ते गोंधळून जातात. नशिबात अचानक आलेल्या या वळणावर त्यांना कसे प्रतिसाद द्यायचे हे कळत नाही.’

‘माझ्या मुलीची शाळा सहल काढत होती. मला ते कळले. मी माझ्या मुलीला विचारले की तू मला हे का सांगितले नाहीस. तिने मला विचारले की तुम्ही सहलीच्या फीचा भार सहन करू शकाल का? पैशांचा काही संबंध असेल तिथे मुले विचारतच नाही.’

‘कुटुंबातील माणसांचा कित्येकदा पती-पत्नीमधला देखील संवाद थांबतो किंवा त्यात खूपच तणाव येतो.’

‘माझ्या मुलाने अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. रात्री जेवताना मी त्याला विचारले की तुझा अभ्यास चांगला चालला आहे का? तो त्याच्या जेवणाचा घास घेऊ शकला नाही, आणि तो रडू लागला. रात्रीच्या जेवणाच्या वेळी जेवणाच्या ताटासमोर माझा मुलाला हमसाहमशी रडताना पाहणे हे एक हृदय पिळवटून टाकणारे दृश्य होते.’

‘काय झालं होतं?’

‘बाबा, अभ्यास करायला वेळ कुठे आहे,’ त्याने विचारले. त्याला त्याच्या कॉलेजात पोहोचण्यासाठी तीन बस बदलाव्या लागत होत्या आणि परत येण्यासाठीही असाच मार्ग होता. अनेकदा पाच तासांचा प्रवास करावा लागत होता. त्या अधिक कॉलेजमधला वेळ. त्यामुळे अभ्यासाला वेळ नव्हताच म्हटले तरी चालेल. त्याला वाटले की आमच्या आर्थिक परिस्थितीमुळे पुण्यात वसतिगृहात त्याला ठेवणे आम्हाला अशक्य होईल. तो अंदाज चुकीचा नव्हता, पण त्याने मला कधीही विचारलेच नव्हते. त्याची परिस्थिती लक्षात आल्यानंतर, मी त्याला कसे तरी करून वसतिगृहात राहण्याची सोय करून दिली.’

‘अरे!’

‘आणि माझ्या मुलीने विचारले – ती दहावीत शिकत होती – तुम्ही मला मॅट्रिकच्या पुढे शिक्षण देऊ शकाल का? या परिस्थितीत मुलींना असे वाटते की मुलाच्या शिक्षणापुढे मुलींच्या भविष्याची आहुती दिली जाऊ शकते. ती हे पुढचे बोलली नाही पण मी न बोललेले ऐकण्याचा प्रयत्न करतो.’

‘साहेब, जर त्यांनी आम्हाला रस्त्यावर टाकले नसते तर असे झाले नसते. काही कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मुलांना त्यांच्या मूळ गावी पाठवले आहे. गावांमध्ये शिक्षणाचा दर्जा खूपच निकृष्ट आहे. काही विद्यार्थी चाकणला पालकांकडे परतले. आमचे विद्यार्थी गावातील शाळांशी जुळवून घेऊ शकले नाहीत. आपण काय करू शकतो?’

‘फक्त तरुण पिढीच नाही तर जुन्या पिढीलाही याचा त्रास होतो. आमचे आई-वडील सत्तरीचे आहेत. त्यांना वैद्यकीय मदतीची आवश्यकता आहे आणि त्यांच्या औषधांवर बराच पैसा खर्च करावा लागतो. आम्ही मेडिक्लेम पॉलिसी पुढे वाढवली आहे, पण ती पुरेशी नाही आणि कोणताही खर्च आमच्यासाठी एक समस्याच आहे.’

‘ते खरं आहे. मला एक अशी केस माहित आहे जिथे आमचा सहकारी त्याच्या वृद्ध मावशीसाठी कॅल्शियमच्या गोळ्या विकत घेऊ शकत नव्हता. त्या तिला दररोज घ्याव्या लागत होत्या.’

‘या परिस्थितीत इतक्या समस्या आल्या ज्यांसाठी आमची तयारीच नव्हती. मुलांचे शिक्षण आणि वृद्ध पालकांसाठी औषधे ही चिंता सर्वांनाच होती. पण काही प्रकरणांमध्ये, खोलवरचा संशय आणि विश्वासघाताची भावना होती.’

‘तुम्ही कशाबद्दल बोलत आहात?’

‘काही तरुण कर्मचाऱ्यांचे लग्न रॅकोल्ड बंद होण्यापूर्वीच झाले होते. त्यांच्या सासरच्यांनी त्यांच्यावर लग्नापूर्वी नोकरीबद्दलची माहिती हेतुपुरस्सर चुकीची देण्याचा आरोप केला. जर मुलाला कायमची नोकरी आणि त्याच्याकडे स्वत:चे घर असेल तर गावाकडची लग्न करण्यास सहमती दर्शविते. आमच्या अनेक कर्मचाऱ्यांकडे दोन्ही होते. नोकरी गेल्यावर सासरच्यांना फसवणूक झाल्याचे वाटले. आमच्या युनियनला त्यांना कागदपत्रे दाखवून त्यांची समजूत काढावी लागली – जे झाले ते दुर्दैव होते आणि दिलेली माहिती चुकीची नव्हती.’

‘अरेरे. तरुण जोडप्यांची दुःखद कहाणी. लग्नानंतर लगेचच ते अडचणीत आले.’

‘कोरोनाने आमचे जीवन आणखी कठीण केले. नोव्हेंबर २०१८ मध्ये आम्ही नोकरी गमावली. २०२० मध्ये कोरोनाने आम्हाला फटकारले. ही दोन वर्षे आमच्या आयुष्यातील सर्वात वाईट वर्षे होती.’

‘हे खरे आहे. काही मित्रांकडे खायला काहीच नव्हते. ते रोजंदारीवर काम करत होते – ते एका ‘चौकात’ उभे असलेले आढळतात की कंत्राटदार त्यांना रंगकाम सारख्या कामासाठी घेऊन जाईल, रोजंदारीवर. त्यांना अपमानित वाटते. त्यांना असे कमनशिब भोगावे लागावे अशी काहीही चूक त्यांनी केली नाहीये.’

‘आम्ही जवळजवळ सर्वजण नोकरीच्या शोधात खेड्यांमधून शहरात आलो आहोत. आम्ही वेल्डिंग आणि तत्सम काम शिकण्यासाठी आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) मध्ये शिक्षण घेतले. गावांमध्ये, आमच्यापैकी काहींकडे ‘पिवळे’ रेशन कार्ड होते. (पिवळे रेशन कार्ड अशा कुटुंबांना दिले जातात ज्यांचे वार्षिक उत्पन्न रु. १५०००/- आहे. अंत्योदय रेशन कार्ड – हे रेशन कार्ड दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांमधील कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना दिले जातात.) रॅकोल्डमध्ये, आमचा पगार महिन्याला ४० ते ५० हजार रुपयांच्या दरम्यान होता. ती एक स्वप्नवत नोकरी होती. आता आमची कमाई नगण्य आहे. आम्हाला भीती आहे की या बेरोजगारीमुळे आम्ही पुन्हा एकदा जैसे-थे होऊ.’

‘पती-पत्नीमधील संवादाचे काय होते?’ मी विचारले. मग एक प्रदीर्घ अस्वस्थ शांतता झाली. दोघांनी अश्रू पुसले.

‘तणाव हा संवादावर दुष्परिणाम करतो. अश्या संवादाचा त्रास होतो. त्यांना म्हणजे आमच्या पत्नीला हे समजते की त्यांचे जीवन आमच्याशी जोडले गेले आहे आणि त्याचा त्यांना त्रास सहन करावा लागतोय. त्यातून बाहेर पडण्याचा अजिबात कोणताही मार्ग नाही. आम्हाला त्यांना आणि आमच्या दोघांच्या मुलांना चांगले जीवन द्यायचे आहे. पण तसे होणार नाहीये.’

‘मी दरवर्षी आमच्या लग्नाच्या वाढदिवशी आणि तिच्या वाढदिवशी तिच्यासाठी एक छान भेटवस्तू खरेदी केली आहे. आता मी ते करत नाही. तिच्या ते लक्षात आलंय, पण तिने एक शब्दही काढला  नाहीये.’

‘आमचे नातेवाईकही आमच्याशी वेगळ्या पद्धतीने वागू लागले आहेत. आता आम्हाला वाटते की ते पूर्वी आमचा आदर करत होते कारण आम्ही आर्थिकदृष्ट्या चांगल्या स्थितीत होतो आणि नोकरी गेल्याने आदरही कमी झाला आहे.’

‘तुम्ही आताशा काय करता? कुठेही काम करत आहात?’

‘हो, मी ऑटो स्पेअर पार्ट्स विकतोय.’

‘तुमचा अनुभव कसा आहे?’

‘भयानक. मला वेल्डिंगचे प्रशिक्षण मिळाले आहे. मला विक्रीच्या कामाचे प्रशिक्षण मिळालेले नाही. आणि या छोट्या उद्योगात टिकून राहणे कठीण आहे. मी ज्या डीलर्सना ऑटो स्पेअर पार्ट्स विकतो ते वेळेवर पैसे देत नाहीत. थकबाकी असलेल्या बिलांची वसुली ही एक मोठी समस्या आहे. ते मान्य केलेल्या दिवसांपेक्षा जास्त क्रेडिट घेतात. पार्ट पेमेंट मिळणे हे तर नेहमीचेच रडगाणे आहे. हे सर्व माझी कमाई घटवते.’

‘आमच्यापैकी दोघे शेअर बाजारात ‘इंट्रा-डे ट्रेडिंग’ करतात. पण त्यासाठी खूप अभ्यास लागतो. आम्हाला शेअर मार्केट ट्रेडिंगचे प्रशिक्षण मिळालेले नाही. आमच्याकडे भांडवल नाही आणि कौशल्यही नाही. आणि आयुष्याच्या या टप्प्यावर पैशाने जोखीम घेणे चांगले नाही.’

स्वत:ची ओळख गमावणे ही सर्वांसाठी एक मोठी समस्या आहे. त्या समस्येला मालकाकडून विश्वासघात झाल्याच्या भावनेची जोड आहे. तीन पिढ्यांवर विपरीत परिणाम होतोय हे स्पष्ट दिसतंय – मुलांचे शिक्षण (मुलींचं देखील कदाचित वेगळ्या कारणांसाठी!), ज्येष्ठ नागरिकांचे (म्हणजे कर्मचाऱ्यांचे पालक) स्वास्थ्य –- आणि स्वतः कर्मचारीदेखील यातून सुटले नाहीत. युनियनने रॅकोल्डविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे परंतु ती वेळखाऊ व जीवघेणी आहे. हळूहळू हे कामगार कायम स्वरूपी नोकरीच्या रोजगाराशिवाय असलेल्या जीवनाच्या कठोर वास्तवाशी जुळवून घेत आहेत. त्यांना पर्यायच  नाही.

पण हे असे व्हायला हवे होते काय याचा विचार कोणी करत नाहीये. नेते मंडळींनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे. कायद्याचा मार्ग अनेक वर्षे चालतो, न्याय मिळेपर्यंत कित्येक आयुष्ये संपूर्ण उद्ध्वस्त झालेली असतात. सामाजिक स्तरात दोनचार पायऱ्या वर चढलेली माणसे पुन्हा पहिल्या परिस्थितीत जातात, आणि ते फार क्लेशदायक असते. घराच्या आतला व घराबाहेर संवाद संपलेला असतो, आणि जगण्याची आशाही चिरडली जाते.

प्रगतीची किंमत कोण मोजतोय त्याची जाणीव कुणाला आहे काय?

विवेक पटवर्धन

"तुम्ही जे मागे सोडुन जाता ते दगडी स्मारकांमध्ये कोरलेले नसून ते इतरांच्या जीवनात विणलेले असते." सर्व काम कॉपीराइट केलेले आहे.