आडाम मास्तर - बंडखोरीकडून सुधारणेपर्यंत

आडाम मास्तर – बंडखोरीकडून सुधारणेपर्यंत

तीनशे पानांच्या पुस्तकातील अर्ध्याहून अधिक भाग वाचल्यानंतरच मी ‘संघर्षाची मशाल हाती’ (‘संघर्षाची मशाल हाती’) हे आत्मचरित्र खाली ठेवले. आणि तेही माझ्या पत्नीने दुपारचे जेवण थंड होत असल्याचा राग व्यक्त केल्यामुळेच.

मार्क ट्वेन यांनी त्यांच्या आत्मचरित्रात म्हटले आहे की, “प्रत्येक माणसाला असे वाटते की त्याचा अनुभव इतरांपेक्षा वेगळा आहे आणि म्हणून त्याने ते लिहून ठेवले पाहिजे – त्याच्या असेही ध्यानी येते की इतरांनी काही मुद्द्यांवर अगदी त्याच्याप्रमाणेच विचार केले आहे आणि अनुभवले आहेत, आणि म्हणूनच त्यांनी ते लिहून ठेवले आहेत.”

आपल्याला आत्मकथन वाचण्यात आनंद कशामुळे मिळतो? मी माझ्या ब्लॉगवर आत्मकथनांची अनेक परीक्षणे प्रसिद्ध केली आहेत. आपण स्वतःला लेखकाच्या जागी पाहतो म्हणून का? की आपण नेहमीच त्याच्यासारखे होऊ इच्छित होतो, पण होऊ शकलो नाही म्हणून असेल का? बरं, तुम्हीच तुमचे उत्तर ठरवा.

यात शंकाच नाही की आत्मकथने मनाची पकड घेतात आणि वाचकाला त्याच्या/तिच्या जीवनाबद्दल विचार करण्यास भाग पाडतात. ‘संघर्षाची मशाल हाती’ नेमका हाच प्रभाव पाडतो. नरसैय्या आडाम उर्फ ​​आडाम मास्तर हे तरुणपणी गरीब विद्यार्थ्यांना गणित शिकवत असत, त्यामुळे त्यांच्या आडनावाला मास्तर (म्हणजे शिक्षक) ही उपाधी चिकटली, जरी त्यांचे शिक्षण फक्त ९ वी पर्यंत झाले होते.

पद्मशाली (आंध्रातील विणकर समुदाय) कुटुंबात जन्मलेल्या नरसैय्या यांच्यावर त्यांच्या वडिलांचा खूप प्रभाव होता जे सीपीआय-एमचे कार्यकर्ते होते. पॉवर-लूम उद्योगातील अनेक (त्यांच्या वडिलांसारख्या) कामगारांप्रमाणेच आडाम कुटुंबही गरिबीत राहत होते. आडाम मास्तरांच्या आईने कुटुंबाच्या तुटपुंज्या कमाईत भर घालण्यासाठी विडया वळण्याचे कामही केले. परिस्थितीने नरसैय्या यांना आयुष्याच्या सुरुवातीलाच स्वतंत्र राहण्यास शिकवले.

नरसैय्या यांची पहिली नोकरी ‘प्रसाद विणकर सोसायटी’ मध्ये होती. त्यांना आढळले की ही संस्था भ्रष्ट लोक चालवतात. त्यांनी बँकिंग अधिकाऱ्यांसमोर भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला आणि परिणामी त्यांची नोकरी गेली!

इथून दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरू झाला. स्थानिक सरकारने बैलगाडी किती वजन वाहून नेऊ शकते हे ठरवल्यावर पहिला संघर्ष सुरू झाला. बैलाला इजा न व्हावी असा विचार होता. परंतु निर्धारित वजन खूपच कमी होते, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ लागले. आडाम मास्तरांनी ५०० बैलगाड्यांची रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर नेली, पण त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा निघाला.

निषेधाचे जगावेगळे मार्ग स्वीकारणे हे आडाम मास्तरांच्या नेतृत्वशैलीचे चिन्हच  आहे म्हणाना. एका प्रकरणात, कामगारांनी आडमुठ्या मालकाच्या घराला घेराव घातला. दुसऱ्या प्रकरणात, एका प्रामाणिक सरकारी अधिकाऱ्याने नियम लागू केल्यामुळे ऑटो-रिक्षा जप्त करण्यात आल्याचे आढळून आले तेव्हा आडाम मास्तरांच्यापुढे पेचप्रसंग आला. आडाम मास्तरांना ऑटोरिक्शा मालकांना मदत करायची होती, परंतु प्रामाणिक अधिकाऱ्याला विरोध करण्याची त्यांची इच्छा नव्हती. त्यांनी दररोज तीस किंवा चाळीस ऑटोमालकांच्या तुकड्यांनी अधिकाऱ्याला भेटून ऑटो सोडण्याची विनंती करण्यास सांगितले. ते यशस्वी झाले.

त्यांचे निषेधाचे सर्वात असामान्य आणि धाडसी कृत्य म्हणजे जेव्हा त्यांनी ऑटोरीक्षांचा मोर्चा न्यायालयावर नेला. न्यायालयाविरुद्ध कोणीही निषेध मोर्चा नेत नाहीत! ती एक मोठी जोखीम होती. ऑटो मालकांना क्षुल्लक गुन्ह्यांसाठी आरटीओ न्यायालयात खेचत होते आणि न्यायालय ५०० रुपये दंड ठोठावत होते. तो काळ १९९३चा, जेव्हा दंडामुळे ऑटो चालकांचे अनेक दिवसांचे उत्पन्न बुडत होते. आडाम मास्तरांनी शेकडो ऑटोंची मिरवणूक न्यायालयात नेली. न्यायाधीशांना हा प्रश्न समजला आणि त्यांनी त्यावर उपाय शोधला.

(कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने केलेले चित्र)

कसलीही दखल न घेणारी संस्था म्हणजे सरकारची विविध खाती. निदान भारताबद्दल तरी हे खरेच आहे. तरीही, आडाम मास्तरांनी काँग्रेस आणि भाजपा यांच्या नेतृत्वाखालील सरकारांवर प्रभाव पाडला. त्यांनी गरीब कुटुंबांना घरे देण्यासाठी एक योजना तयार केली आणि त्यांना २० हजार रुपयांत घरे दिली. त्यानंतर कमी किमतीच्या घरांची आणखी एक योजना त्यांनी आणली ज्याने ४०,००० घरे लोकांना दिली आहेत! होय, तुम्ही बरोबर वाचले आहे – चाळीस हजार घरे.

सोलापूर ‘रे’ नगर सोसायटीची चर्चा करणारा व्हिडिओ (खालील लिंक) पहा. रे म्हणजे राजीव (गांधी) आवास योजना, आणि त्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी केले. आडाम मास्तर डॉ. मनमोहन सिंग आणि देवेंद्र फडणवीस यांचे मन वळविण्यात यशस्वी झाले, व त्यांनी या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखविला.

नेते जेव्हा विध्वंसाकडे वळतात तेव्हा त्यांची दखल घेतली जाते. संवेदनशून्य सरकार आणि स्वार्थ अशी कांही परिस्थिती निर्माण करतात ज्यामुळे हजारो-लाखों लोक गरिबीत आणि पुरेसे अन्न किंवा निवारा न मिळताही कसेबसे जगतात. चांगले नेते परिस्थिती बदलण्यासाठी विविध युक्त्या वापरतात आणि त्यापैकी काही अतिरेकी किंवा टोकाच्या वाटतात, परंतु त्या इच्छित परिणाम देतात. नेते केवळ निषेधांद्वारे प्रभाव पाडत नाहीत, तर अनेकदा अधिकारात असलेल्या लोकांना राजी करून काम करून घेतात.

आणि आडाम मास्तरांचे जीवन म्हणजे नेते बंडखोरांपासून सुधारकांपर्यंत कसे उलगडत जातात याचा धडा आहे. बंडखोरांना काहीतरी काढून टाकायचे असते, ते नष्ट करायचे असते, सुधारकांकडे एक स्वप्न असते, त्यांना काय निर्माण करायचे आहे हे माहित असते आणि ते निर्माण करण्यासाठी अथक प्रयत्न करतात.

 गरजूंना ४०,००० स्वस्त किमतीची घरे देणे हे सक्रिय नेतृत्वाचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. ते फक्त दत्ताजी इस्वलकर यांनी गिरणी कामगारांसाठी केलेल्या कामाशी जुळते. दत्ताजी इस्वलकर कम्युनिस्ट नव्हते, आडाम मास्तर कम्युनिस्ट तत्वज्ञानाशी जोडलेले आहेत, ते सीपीआय-एम पक्षाचे आहेत. पण कार्ल मार्क्स जे म्हणाला ते दोघांनीही अमलात आणले आहे. आणि कार्ल मार्क्सचे वचन त्याच्या कबरीवर कोरलेले आहे, ते असे – “तत्त्वज्ञानींनी जगरहाटीचे विविध प्रकारे अर्थ लावले आहे; पण मुद्दा जगरहाटी बदलण्याचा आहे.”

ह्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात अनेक रात्री जागवाव्या लागतील. सलाम, आडाम मास्तर!