इस्वलकर मी उत्तर शोधतोय

इस्वलकर मी उत्तर शोधतोय

दत्ता इस्वलकर मला ऐकूनच ठाऊक होते. प्रत्यक्ष कधीच भेटलो नव्हतो. ते गिरणी कामगारांचे नेतृत्व करीत होते, आणि मी त्या वेळेस, म्हणजे २००८ साली, एशिअन पेंट्स कंपनीच्या ह्युमन रिसोर्स विभागाचा प्रमुख होतो. पण कामगार क्षेत्राशी ज्यांचा संबंध आला आहे त्यांना इस्वलकर माहित नसणे असंभवच. इस्वलकरांचा विचार मनात येण्याचं एक कारण होतं. दरवर्षी कंपनीतल्या एच आर मॅनेजर्सची एक सभा भरवीत होतो, आणि त्यासाठी एका वक्त्याला आमंत्रण दिले जायचे. त्यामागील हेतू असा की त्या वक्त्याच्या कार्यापासून आम्हाला चांगलं कार्य करण्याची प्रेरणा घेतां यावी. आमच्या चर्चेत इस्वलकरांच नांव कोणीतरी सुचवलं आणि सर्वांनी तात्काळ ती सूचना उचलून धरली.

मी इस्वलकरांना फोन केला आणि भेटायचं ठरलं. दादरच्या एका जुन्या बिल्डींगमध्ये युनियनच्या कार्यालयात. जुनी पुराणी बिल्डींग, लाकडी जिन्यांची. मी पहिल्या मजल्यावर गेलो. एक मोठी खोली त्यात दोन जुनी लाकडी कपाटे, त्यात तशीच जुनी पुस्तके, भिंतीवर वर्तमानपत्रातील काही कात्रणे लावलेली, आणि त्यात मेधा पाटकरांचा फोटो, आणि दोन तीन खुर्च्या. इस्वलकर कोपऱ्यातल्या एका खुर्चीवर बसले होते. ‘या, या, मी तुमचीच वाट पहात होतो.’

इस्वलकर आणि मी

मी त्यांचा फोटो अगोदर पाहिला होता म्हणून ओळखले. इस्वलकरांना भेटल्यावर सर्वप्रथम जाणवतं ते त्यांचं वेगळेपण. गळ्यात सोन्याची चेन नाही, हातात सोन्याची ब्रेसलेट नाही, पोट शर्टातून बाहेर ओसंडत नव्हतं, शरीर ‘वजनदार’ नाही, आजूबाजुला चार-पाच समर्थक वा चेले नव्हते. सडसडीत बांध्याचे, डोक्यावरचे आणि मिशीचे केस पांढरे शुभ्र झालेले. इस्वलकरांची भाषा गोड, आर्जवी आणि मृदु होती. आणि तरीही हा माणूस लाखो कामगारांचा नेता होता. कसं शक्य आहे हे?

पण इस्वलकरांचं काम खूप मोठं होतं हे तर सर्वश्रुत होतं. त्यांच्या नेतृत्वामुळे आठ-दहा हजार कामगारांना घरं मिळाली होती. (आता हा आकडा वीस-पंचवीस हजारापुढे आहे).

मी इस्वलकरांना ‘एच आर मीट’चे आमंत्रण दिले आणि त्यांनीही कोणतेही आढेवेढे न घेता स्वीकारलेही. ठरल्यादिवशी ते आले. गिरणी कामगारांच्या समस्येवर आणि त्यांच्या कार्याबद्दल ते दोन तास बोलले. हिंदी आणि इंग्रजी मिश्रित त्यांच्या वक्तृत्वाने सगळे स्तिमित झाले. त्यात सरकारला, त्यांच्या धोरणांना दूषणं नव्हती, पण ‘तुम्ही (गिरणी मालकांनी) पैसा लावलात, तर आम्ही श्रम लावले, आता गिरण्या बंद पडल्या त्या जागेवर आम्हाला घर मिळायला हवे’ असा साधा विचार होता.

दत्ता इस्वलकर

इस्वलकरांसारखी कर्तृत्वाने मोठी माणसं, ज्यांच्याकडे समाज आदराने बघतो, त्यांच्याशी बोलताना मला फार अवघडल्यासारखे होते. इस्वलकरांचा स्नेह जसा वाढला, तसा आमच्यातील मोकळेपणादेखील. मग अनेकदा अधून-मधून फोन झाले. दोन-तीन वेळा त्यांनी त्यांच्या कार्यक्रमाला येण्याचं आमंत्रणही दिलं. त्यातला एक रवींद्र नाट्यगृहात झाला. व्यासपीठावर होते इस्वलकर, निखील वागळे आणि अरुंधती रॉय. निखील वागळेनी त्यांच्या खास शैलीत भाषण केलं, आणि इस्वलकरांना विचारलं, “तुमच्यासारखे स्वच्छ चारित्र्याचे आणि समाजकार्यासाठी स्वत:ला झोकून देणारे नेते राजकारणात उतरले नाहीत तर आम्ही कुणाकडे बघायचं?” पण इस्वलकरांनी हा तीर चुकवला – त्यांच्या भाषणात त्यांचा रोख कामगारांच्या प्रश्नावर ठेवला आणि राजकारणात उतरण्याच्या आव्हानाला उत्तर दिलंच नाही. आपल्याला काय करायचंय आणि काय जमेल याचं भान त्यांना होतं.

असेच एक दिवस फोनवर बोलताना मी म्हणालो, ‘मला तुमचं व्हिडिओ रेकोर्डिंग करायचंय.’ “या की” ते म्हणाले, “रामनिवास बिल्डींग. परळच्या रेल्वे वर्कशॉपसमोर आहे.” मला इतका पत्ता पुरेसा होता. पण ते पुढे म्हणाले, “तळमजल्यावर ‘लक्ष्मी बार’ आहे.” आम्ही दोघेही हसत सुटलो. “अहो, आता अमुक-तमुक मिलच्या जवळ किंवा समोर असा पत्ता सांगायची सोय राहिली नाही – आत्ताचा लँडमार्क म्हणजे बार!” मी रामनिवास बिल्डींगमध्ये गेलो. प्रवेश करताच आपण एका चौकात शिरतो, मुंबईतल्या जुन्या इमारतींमध्ये असा चौक हमखास असे – जुन्या पिक्चरमध्ये तुम्ही पाहिलं असेलच. इस्वलकरांचं ऑफिस समोरच्याच खोलीत होतं. जॉर्ज फर्नांडिसबरोबर काम करणाऱ्या लक्ष्मण जाधव यांचं ते ऑफिस होतं, त्यांनी इस्वलकरांच्या युनियनला तिथे ऑफिस थाटून दिलं होतं. तीन टेबलं, तशीच कपाटं, सर्व काही दाटीवाटीनं ठेवलेलं. एका टेबलामागे इस्वलकर. गप्पा झाल्यावर मी ‘रेकोर्डिंग करुया’ म्हणालो. “करू या की!” ते म्हणाले. “चौकात अधिक उजेड आहे, तिथे येता कां?” “चला.”

मग आम्ही तिथे आणि ऑफिसात रेकोर्डिंग केले. (मी ब्लॉगच्या शेवटी व्हिडिओ दिले आहेत. जरूर पाहावेत.)

गेल्या वर्षी मार्चमध्ये इस्वलकरांनी फोन केलं. राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या ऑफिसला या, म्हणाले आणि मीही गेलो. (काय योगायोग बघा – ती तारीख ११ मार्च होती, म्हणजे आज एक वर्ष एक महिना झाला.) एका मोठ्या टेबलामागे इस्वलकर बसले होते. आजूबाजूला दोघे तिघे. नेहमीप्रमाणे माझं हसून स्वागत झालं, आणि ‘या, या!’ म्हणून. मला तिथे समजलं की त्यांचा सत्कार होणार होता. पण त्यासाठी वेळ होता, मी बराच अगोदर पोहोचलो होतो. इस्वलकर तसे सडपातळ बांध्याचेच पण त्या दिवशी अधिकच कृश वाटले. मी त्यांच्या स्वास्थ्याची चौकशी केली. ‘तसा ठीक आहे हो, पण एक प्रकारची नर्व्हची कंडीशन आहे.’ त्यांनी मला दहाही बोटं दाखवली. ‘बोटं हलवता येत नाहीत’, म्हणाले. (नंतर खालच्या मजल्यावर जायला त्यांना दोघांनी धरून नेले तेव्हां मला त्यांच्या आजाराची कल्पना आली!) मग मी विषयांतर करून गप्पा केल्या. ‘गिरणी संपाला चाळीस वर्षे होऊन गेली – कित्येक हजार कामगारांना मोफत घरे मिळाली. मागे वळून पाहताना काय वाटतंय?’

“चार्ल्स कोरियाने हा मुद्दा सर्वप्रथम घेतला की मुंबई फार ‘कनजस्टेड’ आहे, आणि मुंबईचं शांघाय करायचं असलं तर ही एक संधी आहे की आपल्याकडे सहाशे एकर जागा आहे गिरण्यांची – आणि आता त्या चालणार नाहीयेत – तर त्या जागेचा चांगला वापर करतां येईल. ही त्यांचीच मूळ कल्पना.’ आता इतकं भरघोस काम करूनही स्वत:बद्दल बोलायचं सोडून चार्ल्स कोरियाला क्रेडीट द्यायला इस्वलकर विसरत नाहीत!

“मागे वळून पाहताना काय वाटतंय?” मी आठवण करून दिली.

“गिरणी कामगार लढाऊ होता. टिळकांना सहा वर्षे शिक्षा झाल्यावर सहा दिवस संपावर गेला. लाक्षणिक – सहा वर्षे म्हणून सहा दिवस. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत तो उतरला. मला असं वाटतंय की एका लढाऊ कामगाराचा अंत झाला. आत्ता असे होणे नाहीये. आता काय चाललंय ते, आणि कारखान्यांतली परिस्थिती तुम्हाला माहित आहेच. आता कोणीही रस्त्यावर यायला तयार नाहीये – आहे ते सगळे मुकाट्याने सहन करीतच जातायत. आम्ही गिरणी कामगारांचा लढा केला तो ऐतिहासिक झाला.”

राष्ट्रीय मिल मजदूर संघ ऑफिस आणि त्यामागील घरं

त्या संपाने इतिहास घडविला, तसाच गिरणी कामगारांना घरं मिळावीत म्हणून केलेला लढा – त्यानेही इतिहास घडवला. इस्वलकरांच्या बरोबर विविध विचारसरणीचे कार्यकर्ते होते, अधिकतर डावेच. पण इस्वलकर वर्ग-संघर्षाची भाषा बोलले नाहीत. त्यांनी फक्त ‘आम्हाला घरं मिळायला हवी, कामगारांची मागणी न्याय्य आणि रास्त आहे, ती मंजूर व्हायलाच हवी,’ अशी त्यांची भाषा. मोठी संघटना बांधली. त्यांच्या उपोषणाच्या वेळी खुद्द मुख्यमंत्री आले, उपोषण सोडा म्हणून विनंती करायला. हजारो कामगारांना घरे देऊन ते मात्र गिरणीच्या घरातच राहिले. आणि इतकं करूनही प्रसिद्धीपासून दूर राहिले.

एका मिलमधला हा शिपाई, नंतर तो तिथे क्लार्क होतो, त्याचं कामगार नेत्यात रुपांतर होतं, पंचवीस हजार कुटुंबांना मोफत घरं मिळवून देतो, बिल्डर माफिया आणि त्यांच्या खिशातल्या सरकारकडून ते सन्मार्गाने मिळवतो – हे सारंच अद्भुत आहे.

मला आता तोच प्रश्न पडला आहे जो विजय तेंडुलकरांना (पहा रामप्रहर) पडला होता. ‘प्रश्न तोच आहे. ही माणसे एकीकडे तर अगदी आपल्यासारखी, आपल्यातलीच वाटतात. नव्हे, असतातच. मग आपण त्यांच्यासारखे कां होत नाही? ती आपल्याएवढीच कां राहत नाहीत?’ मी देखील उत्तर शोधतोय!

विवेक पटवर्धन

“What you leave behind is not what is engraved in stone monuments, but what is woven into the lives of others.” **** “Aroehan: Creating Dream Villages in Mokhada by 2025: “No Malnutrition Deaths, No Child ‘Out of School’, Reduction in migration by 50%.”