रेणुका बुधारम - एक विलक्षण आयुष्य

रेणुका बुधारम – एक विलक्षण आयुष्य

मी सुश्री रेणुका बुधारम यांची मुलाखत घेतली, त्यांच्या जीवनकथेने मी प्रेरित झालो आणि मला जाणवले की मी एका विलक्षण व्यक्तीला भेटलो आहे. हे सर्व माझ्या सोलापूरच्या भेटीपासून सुरू झाले, माझी भेट केवळ बीडी कामगारांच्या परिस्थितीबद्दल जाणून घेण्याची नव्हती; तर त्यांच्यातील उत्कर्षाच्या घटना जाणून घेण्याबद्दल देखील होती. सोलापूरला आमच्या आगमनाच्या पूर्वसंध्येला मी कार्यकर्त्यांच्या एका गटाला भेटलो आणि त्यामध्ये डॉ. मीना गायकवाड होत्या ज्यांनी बीडी उद्योग आणि कामगारांवर संशोधन केले होते; हा त्यांच्या डॉक्टरेट प्रबंधाचा विषय होता. तिने माझी रेणुकाशी ओळख करून दिली.

रेणुका चार वर्षांची होती जेव्हा तिचे वडील कुटुंब सोडून गेले. रेणुका यांच्या मनात शेवटचा निरोप कोरला गेला जेव्हा त्यांनी रेणुकाला व तिच्या आईला सोलापूरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसवले आणि ते मात्र उतरून गेले. रेणुकाची आई मुंबईला परतली आणि गिरणीच्या गेटवर लहान रेणुकाला घेऊन वाट पाहत असे, तिच्या पतीला पुन्हा भेटण्याची आशा होती पण तसे झाले नाही.

मामासोबत काही वेळ घालवल्यानंतर, आई-मुलगी सासरी गेली. रेणुकाला या दरम्यान वाचनाची खूप आवड निर्माण झाली होती, तिने ‘चांदोबा’ मासिकाचे अनेक खंड वाचले. तिचे शालेय शिक्षण सुरुवातीला तेलुगू शाळेत सुरू झाले परंतु नंतर ती मराठी माध्यमात हलवण्यात आली.

रेणुका पद्मशाली समाजाची आहे ज्यांचे मूळ तेलंगणात आहे आणि ते तेलुगू बोलतात, परंतु सोलापूरमध्ये त्यांनी मराठी देखील शिकली आहे. ते व्यवसायाने विणकर आहेत. शालेय शिक्षण तिच्यासाठी आनंदाचे होते. ती ‘खबरदार जर टाच मारुनी ..’ आणि ‘हिरवे हिरवे गार गालीचे’ अश्या कविता म्हणत असे आणि वर्ग तिच्या मागे गात असे. दुर्दैवाने तिच्या कुटुंबाने तिला शाळेतून काढून घेतले. ती ७ वी मध्ये असताना कुटुंबाने तिचे नांव शाळेतून काढून घेण्याचा निर्णय घेतला आणि रेणुका १४ व्या वर्षी बीडी कामगार बनली!

रेणुकाने तिच्या आई आणि आजीसोबत अनेक चित्रपट पाहिले. तिचे आवडते नायक एनटी रामाराव, नागेश्वर राव, शोभन बाबू आणि अभिनेत्री सावित्री होते. ते मराठी आणि हिंदी चित्रपटही पाहत असत. पूर्ण लक्ष देऊन पाहताना रेणुका कलाकारांचे आकर्षक डायलॉग लगेचच बोलू लागली. आणि रेणुकाला  वाटले की आपण कधी टीव्ही शोमध्ये दिसू का – नंतरच्या आयुष्यात ही इच्छा पूर्ण झाली.

वयाच्या अवघ्या १७ किंवा १८ व्या वर्षी तिचे लग्न पुरुषोत्तम बुधारामशी झाले. पुरुषोत्तमचा भरतकामाचा व्यवसाय होता, पण संगणक त्या उद्योगात घुसल्यामुळे मंदी आली, आणि त्यामुळे भरतकामाची कौशल्ये लोप पावली होती. पण रेणुकाने यादरम्यान एक दुकान सांभाळले होते ज्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला.

(रेणुका बुधारम)

दुसरीकडे दोन कामे सुरूच होती – सतत वाचन आणि विडी करणे. रेणुकाची वाचनाची आवड इतकी जबरदस्त होती की ती विडया वळताना देखील पुस्तक वाचत असे, सुपामध्ये तंबाखू व त्यातच तिचे पुस्तक ठेऊन वाचन चालू असे! तिने ३० वर्षे विडया वळल्या, ती ‘कार्ड होल्डर’ होती म्हणजे तिला अनेक सामाजिक सुरक्षेचे लाभ मिळत होते आणि आता तिला पेन्शन देखील मिळते.

दरम्यान, रेणुका अनेक ‘सत्संग’ आणि ‘कीर्तन’ कार्यक्रम बघू लागली. भजनाच्या शब्दांनी तिचे मन मोहून टाकले. तिने एका कवितेच्या चार ओळी लिहिल्या ज्या एका वर्तमानपत्रात छापून आल्या. तोच एक महत्त्वाचा टप्पा होता. लोकमतच्या रवींद्र जोगी पेटकर यांनी तिची प्रतिभा ओळखली आणि तिला मार्गदर्शन केले.

गुढीपाडव्याच्या उत्सवात एका कविता स्पर्धेत रेणुकाने सहा कविता पाठवल्या. तिने पहिले पारितोषिक जिंकले. अशा प्रकारे कवयित्री म्हणून तिचा प्रवास सुरू झाला. तिची ‘मुलगी’ ही कविता स्थानिक दैनिक ‘संचार’ मध्ये प्रकाशित झाली. तिला आता कवयित्री म्हणून ओळख मिळत होती. याच सुमारास एका स्थानिक टीव्ही चॅनेलने उद्घोषक म्हणून नोकरीची जाहिरात केली. निवड झालेल्या महिलेला मराठी येत नव्हते म्हणून रेणुका यांना अनुवादक म्हणून नोकरी मिळाली. ती टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आली होती. ती लवकरच उद्घोषक म्हणून पुढे आली.

एके दिवशी तिला अचानक बातम्या वाचण्यासाठी बोलावण्यात आले. रेणुका चेंजिंग रूममध्ये गेली आणि आरशासमोर उभी राहिली. कॅमेऱ्याला तोंड देण्याचा विचारानेच ती खूप घाबरली. तिला धीर देणारे कोणीही नव्हते, हे तिला जाणवले. तिला स्वतःहून हे आव्हान स्वीकारावे लागले. रेणुका तिचे सर्व पणाला लावून काम फत्ते करण्याचा निर्धार करून चेंजिंग रूममधून बाहेर पडली. तेव्हापासून तिने मागे वळून पाहिले नाही.

दोन वर्षांनंतर ती दुसऱ्या स्थानिक टीव्ही चॅनेल ‘स्वरांजली’ मध्ये गेली. ती तिथे उद्घोषक म्हणून काम करते आणि काही कार्यक्रमांची आखणी करण्यासह विविध कामे केली आहेत. ती ‘चित्रलहरी’ कार्यक्रम चालवते जो दूरदर्शनवरील ‘छाया गीत’ सारखाच आहे. ‘चित्रलहरी’ हा स्वरांजली वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम आहे. रेणुका या कार्यक्रमासाठी जुनी लोकप्रिय गाणी निवडते.

रेणुका अनेकदा आकाशवाणी हैदराबाद आणि सोलापूर स्टेशनवरदेखील कार्यक्रम करीत होती. आणि तिची भाषा समृद्ध करण्याचे श्रेय त्यांना देते. ती तेलुगु आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये कविता लिहिते.

(सुशीलकुमार शिंदे समवेत रेणुका)

तिला तेलुगु चित्रपटांच्या सुपरस्टार आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या तनिकेला भरनीची ओळख करून देण्याची संधी मिळाली. तो केवळ एक अभिनेताच नाही तर पटकथालेखक, कवी आणि नाटककार देखील आहे. रेणुकाने त्याची ओळख करून दिली तेव्हा तो प्रभावित झाला. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या एका कार्यक्रमात, तनिकेला भरनी यांनी विचारले की रेणुका उपस्थित आहे का. तिला स्टेजवर येण्यास सांगण्यात आले. तनिकेला भरनी यांनी तिला एक फूल दिले आणि सांगितले की तिला पद्मश्री पुरस्कारच द्यायला हवा. काही लोक आता तिला ‘पद्मश्री रेणुका’ म्हणून संबोधतात. रेणुकासाठी, एखाद्या सेलिब्रिटीने केलेली ही पहिलीच कौतुकाची वेळ नव्हती.

एकदा जेव्हा ती बांगड्या खरेदी करण्यासाठी गेली तेव्हा तिला जवळच एक पुस्तकाचे दुकान दिसले आणि ती त्यात शिरली. साहित्य अकादमीकडून २०१४ सालसाठी तेलुगू भाषेसाठी बाल साहित्य पुरस्काराने सन्मानित झालेले दसारी वेंकटरमण यांचे ‘आनंदम’ हे पुस्तक तिथे होते.

रेणुकाने एक परिच्छेद वाचला, पुस्तक विकत घेतले (बांगड्या खरेदी केल्या नाहीत) आणि भाषांतर करण्याची परवानगी मागितली. तिचे भाषांतरित पुस्तक सोलापूरचे सुशील कुमार शिंदे (माजी गृहमंत्री, मनमोहन सिंग सरकारमधील ऊर्जामंत्री) यांच्या हस्ते प्रकाशित झाले. या अनुवादित पुस्तकाला राज्य पुरस्कार मिळाला. दसारी वेंकटरमण यांनी रेणुकाचे नांव सुचवले व ‘आधुनिक सारथी’ मासिकाच्या सहाय्यक संपादकपदी तिने सात वर्षे काम केले.

महिला बिडी बनवतात. रेणुका यांना यशाच्या कथा सादर करायच्या होत्या म्हणून त्यांनी २८ हाय प्रोफाईल व्यक्तींची निवड केली ज्यांच्या आई बिडी बनवतात. त्यांनी त्या ‘बिडी कामगार-मातांच्या मुलांची यशोगाथा’  या मराठी पुस्तकात सादर केल्या. (स्वरूपदीप प्रकाशन, सोलापूर, पृष्ठे १७५, किंमत ३५० रुपये) आणि ती व्यक्तिचित्रे थक्क करणारी आहेत. या कथा बीडी कामगार-मातांचा त्यांच्या मुलांवर किती प्रभाव होता याच्या आहेत. अठ्ठावीस कथांपैकी पाच कथा महिलांच्या आहेत आणि त्यात रेणुकाची कहाणी देखील समाविष्ट आहे. येथे एक छोटी यादी आहे जी तुम्हाला बिडी कामगार-मातांच्या हाय प्रोफाईल मुला/मुलींची झलक देईल. डॉ रामदास पापय्या सब्बन (एलएलएम, पीएचडी कायदा आणि राज्यपाल आणि पोलीस आयुक्तांचे विशेष समुपदेशक), डॉ श्रीकांत दत्तात्रय माकम (एमएस, एफएमएएस, डीएनबी), विष्णू रघुपती दासरी (बी कॉम, एलएलबी, न्यायाधीश), डॉ लता मंजुनाथ (पाटील) मिठ्ठकोल (एमबीबीएस, डीजीओ, एफसीपीएस), उमेश अशोक गुल्लापल्ली (डीफेन्स, Rolls Royce Aerospace and Defense, Bristol, UK येथे काम)

रेणुका कविता लिहित राहिली आणि अनेक कवी संमेलनांमध्ये तिला आमंत्रित करण्यात आले. ती एक लोकप्रिय कवयित्री आहे. अलीकडेच तिला राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

तिने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात बीएच्या वर्गांसाठी प्रवेश घेतला. वर्गातील विद्यार्थी सर्व तरुण सहाजिकच रेणुका तिच्या वयामुळे त्यांच्या न बसणारी व्यक्ती होती, परंतु लवकरच वर्गाने तिला स्वीकारले ते तिच्यातील कवितेच्या प्रतिभेमुळे. तिला सातवीच्या वर्गात शाळेतून काढून घेतले होते, आणि आता तीच रेणुका पदवीधर झाली आहे!

एक व्यक्ती सर्व अडचणींवर कशी काय मात करते, कवी म्हणून उदयास येते आणि नाव कमावते – हा एक प्रश्न आहे जो कुणालाही भेडसावेल. तरीसुद्धा, काही नोंदी – आणि हे सर्व माझेच विचार. एक पैलू ज्यावर सर्वजण सहमत असतील तो म्हणजे माणसाचा असा उदय ‘आत्मशोध’ प्रक्रियेच्या परिणामी होतो. अशी आत्मशोधाची प्रक्रिया केवळ सुशिक्षितांच्या आवाक्यात असते असे अजिबात नाही. शोध म्हणजे शिकणे नव्हे. जेव्हा आपल्याला अपरिचित परिस्थितींचा सामना करावा लागतो तेव्हा आपण स्वतःला (तुकड्या-तुकड्यांमध्ये) सापडतो. अश्या आत्मशोधांना गुरु वा मार्गदर्शक देखील मदत करतात आणि रेणुका यांना अनेक मार्गदर्शक म्हणजे मेंटर होते.

मार्गदर्शनाचा तिचा पहिला अनुभव तेव्हा होता जेव्हा तिने तिच्या कविता प्रकाशित करण्यास सुरुवात केली. शोध प्रक्रियेत महत्त्वाचे म्हणजे आत्मविश्वासाने अपरिचित क्षेत्रात जाणे. ते एखाद्याच्या धैर्य आणि आत्मविश्वासाबद्दल आहे. रेणुकाचे ‘अनुवादक’ ते अनाऊन्सर असे संक्रमण सोपे नव्हते – ती कबूल करते की ती घाबरली होती आणि तिच्या मनात स्वतःबद्दल शंका होती, परंतु ती दिलेले काम यशस्वी करण्याबाबत दृढनिश्चयी होती.

तेलुगूमधून मराठीत कथांचे भाषांतर करणे हे सामान्य व्यक्तीसाठी, आत्मविश्वास नसलेल्या व्यक्तीसाठी कठीण काम असेल. आणि येथे एक महिला होती जिने सहावीच्या पुढे शिक्षण घेतले नव्हते. रेणुकाने दसरी वेंकटरमण यांना त्यांच्या पुस्तकाचे भाषांतर करण्याची परवानगी मागितली. ते एक मोठे धाडसी पाऊल होते. रेणुकाचा सक्रिय दृष्टिकोन वेगळा दिसतो आणि तीच नेता असण्याची ओळख आहे. एक उल्लेखनीय पैलू म्हणजे रेणुका विचारात अजिबात नकारात्मक नाही. आयुष्याने तिच्यासाठी सर्वोत्तम डाव दिला नाही, परंतु तिने खेळात यशस्वी होण्याच्या सर्व चाली खेळल्या आहेत. या सर्व गुणांसाठी आणि बीडी कामगार ते कवी आणि टीव्ही उद्घोषक बनण्याच्या बाबतीत, रेणुकाचे जीवन आपल्यासाठी अनेक धडे घेऊन येते.

ता. क. रेणुका नमूद करतात की ती तिच्या मार्गदर्शक दत्ता हलसगीकर, गोमा पवार, डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली, निर्मला मठपती आणि माधव पवार यांच्यापासून खूप शिकली आणि त्यांची ऋणी आहे. ती तिचे काका रामचंद्र आणि काकू लक्ष्मीबाई तसेच तिच्या कुटुंबाची खूप ऋणी आहे.