बीडी कामगारांच्या जगाचे भयाण वास्तव

बीडी कामगारांच्या जगाचे भयाण वास्तव

सोलापूरला जायचं उद्देश बीडी उद्योग व कामगारांच्या प्रश्नाचे वास्तव समजून घ्यायचा होता. नागेशला भेटायचे ठरले.

नागेश आमच्यासोबत सर्वत्र होता आणि आमच्या संवादांवर बारकाईने लक्ष ठेवून होता. त्याचे वडील कापड उद्योगात कामगार होते तर त्याची आई बिडी कामगार होती. मला त्याच्या आईला भेटायचे होते. नागेशची आई एक आनंदी महिला आहे; ती त्याच्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ बसून बिडी रोल करत होती!

नागेश हा एक यशस्वी व्यापारी आहे ज्याने त्याच्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शिवणकाम सुरू केले आणि आता त्याने एक छोटी कार्यशाळा उभारली आहे ज्यामध्ये पंधरा आधुनिक शिलाई मशीन बसवल्या आहेत. त्याने स्वतःसाठी एक लहान आणि सुंदर घर बांधले आहे.

नागेशने आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले आहे. त्याचा मुलगा सिव्हिल इंजिनिअर आहे आणि मुलगी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर आहे. त्याच्या आईचे लग्न लहानपणीच झाले असावे कारण ती फक्त सहासष्ट वर्षांची आहे आणि तिला मोठी नातवंडे आहेत.

“तुम्ही शाळेत गेला होता का?” मी विचारले.

“नाही. तो मास्तर विद्यार्थ्यांना शिक्षा करायचा आणि त्यांना मारहाण करायचा म्हणून मी घाबरून कधीच शाळेत गेले नाही” ती हसत म्हणाली आणि बीडी बनवत राहिली.

“तुम्ही केव्हापासून बीडी बनवत आहात?”

 “मी दहा वर्षांची असल्यापासून मी माझ्या आईला मदत करीत होते”

“तुम्ही एका दिवसात किती बीडी बनवता?”

“जवळजवळ हजार, मी नेहमीच बीडी बनविण्यात हुशार होते”

“आता तुमचा मुलगा चांगले उत्पन्न मिळवत असताना तुम्ही बीडी का बनवता?”

“माझ्याकडे मोकळा वेळ आहे आणि मला माझे पैसे हवेच असतात. मला कमाई आत्मविश्वास देते”

एकदा का तुम्ही बीडी कामगार झालात, जन्माचे बीडी कामगार बनता! नागेश म्हणाला की, विडी कामगार ५२ वर्षांच्या वयात निवृत्त होतात आणि त्यांना ८०० ते १००० रुपये पेन्शन मिळते. त्यांची आई निवृत्त झाली होती पण ती विडी बनवत होती आणि जास्त पैसे कमवत होती.

आम्ही निघालो. आडाम मास्तरांच्या कार्यालयातील एक कार्यकर्ता आमच्यासोबत होता आणि आम्ही झोपडपट्टीच्या दिशेने चालत गेलो. ‘आत या’, तो म्हणाला. आम्ही त्याच्या घरात शिरलो. ते खूप लहान घर होते, प्रत्यक्षात एका खोलीचेच घर, कदाचित १२ फूट बाय १० फूट, आणि त्याच्या एका कोपऱ्यात स्वयंपाकघराचा प्लॅटफॉर्म आणि दुसऱ्या कोपऱ्यात एक पलंग होता. पलंगाजवळच्या भिंतीवर एक छोटा टीव्ही लावला होता. एका कोपऱ्यात पाणी साठवण्यासाठी आणि त्यातून पाणी काढण्यासाठी प्लास्टिकची टाकी तीन फूट उंचीवर ठेवली होती. सोलापूरच्या अनेक भागांना पाच दिवसांतून एकदा पाणी मिळते!

दोन महिला जमिनीवर बसल्या होत्या, एक कात्री वापरून तेंदूची पाने कापत होती. तेंदूचे पान बीडी बनवायला आयताकृती आकारात कापले जाते. ते कापण्यापूर्वी ते पाण्यात बुडवून ओले केले जाते ज्यामुळे ते सहज गुंडाळता येईल. दुसरी महिला बिडी बनवीत होती. तिने एका ताटात कापलेली पाने आणि तंबाखू ठेवली होती. ती खूप वेगाने बिडी बनवीत होती.

आम्ही महिलांशी बोललो. त्या हसल्या पण त्यांचे काम चालू ठेवले. त्या तेलुगू बोलतात. सोलापुरात तेलुगू भाषिकांची मोठी लोकसंख्या आहे आणि त्यापैकी बरेच जण पद्मशाली समाजाचे आहेत. पद्मशाली समाज हा मुळात विणकरांचा समुदाय आहे जो तेलंगणाहून नोकरीच्या शोधात सोलापुरात स्थलांतरित झाला. सोलापुरात पूर्वी अनेक कापड कारखाने होते; त्याची सुरुवात हातमागापासून झाली आणि ते पॉवरलूममध्ये अपग्रेड झाले. परंतु उत्तरेकडील तीव्र स्पर्धेमुळे पॉवरलूम उद्योगावर विपरीत परिणाम झाला आहे. पानिपतमधील उद्योगांबद्दल ऐकायला मिळते जे सोलापुरात ‘सोलापुर चादर’ विकतात! महिला बिडी बनवतात, नाश्ता करतात आणि नंतर बिडी गोळा करणाऱ्या केंद्रात जातात. त्या वजन करून घेतलेले उत्पादन देतात आणि त्याच्या नोंदी ठेवल्या जातात. त्यांना पंधरा दिवसांतून एकदा बँकेतून पैसे दिले जातात (दुसऱ्या ठिकाणी आम्ही ऐकले की त्यांना महिन्यातून एकदा पैसे दिले जातात) त्यांच्या उत्पादनानुसार.

दोन्ही महिला हसल्या आणि आम्हाला शुभेच्छा दिल्या पण त्यांनी काम करणे थांबवले नाही. त्यातली एक आश्चर्यकारक वेगाने बिडी बनवत होती.

“दिवसभर त्या बिडी बनवीत असतात. त्यापैकी काही लहान मुली असल्यापासून हे करत आहेत. दहा वर्षांची मुलगी तिच्या आईला मदत करण्यासाठी बिडी बनवीत असल्याचे आढळणे दुर्मिळ नव्हते, आता परिस्थिती बदलत आहे.”

“त्या केंद्रात बिडी देतात आणि घरी जाताना भाज्या खरेदी करतात. दुपारी किंवा संध्याकाळी महिलांचा एक गट एकत्र बसून गप्पा मारत बीडी बनवताना दिसतो”

मला माझे बालपण आठवले. माझी आई आणि तिच्या परिसरातील महिला मैत्रिणी उन्हाळ्यात वर्तुळाकार बसून ‘पापड’ आणि इतर उत्पादने बनवत असत. अखेरीस उत्पादन कसे वाटले जाईल याबद्दल स्पष्ट समज होती. हा एक सामाजिक मेळावा होता जिथे कामामुळे त्यांना एकत्र आणले गेले, पण मैत्री अधिक दृढ होत गेली. आणि त्यांच्या जगाबद्दल बरीच माहितीची देवाणघेवाण झाली.

“त्या संध्याकाळी तरी बाहेर फिरायला जातात का?” मी विचारले आणि पण उत्तर तर माहित होते.

“नाही साहेब. त्या जेवणाची वेळ होईपर्यंत बीडी बनवत राहतात आणि नंतर जेवणानंतर पुन्हा बीडी बनवू लागतात. काही जण मध्यरात्रीही बीडी बनवताना दिसतात.”

ज्या ठिकाणी त्यांचे उत्पादन जमा करतात त्या केंद्रात तेंदूची पाने आणि तंबाखू ठेवलेला असतो. तो माल वजन करून दिला जातो.

“ते हजार बीडी बनवण्यासाठी पुरेसे तेंदूची पाने आणि तंबाखू देतात का?”

“नाही, कधीकधी ते पुरेसे नसते. मग महिला जास्त तेंदूची पाने आणि तंबाखू खरेदी करतात. त्याचा त्यांना जास्त खर्च येतो.”

आम्ही चालत होतो, आम्ही एका नगरसेविकेच्या घरी पोहोचलो. ती देखील बीडी करण्यात गुंतलेली होती! विश्वास ठेवा किंवा ठेवू नका!!

मुंबई किंवा ठाण्यात नगरसेवक होणे म्हणजे करोडोंची लॉटरी लागण्यासारखे आहे. ते चकाचक दिमाखदार मोठया  गाड्यांमध्ये फिरतात. मी सोलापूरच्या एका नगरसेविकेला भेटत होते जी पैसे कमविण्यासाठी बीडी करत होती. आम्ही चालत राहिलो. मला महिलांच्या एका गटाशी बोलायचे होते.

“सकाळी ११.३० वाजले आहेत आणि त्यापैकी अनेक घरी नसतील. त्या संकलन केंद्रात गेल्या असणार,” ती म्हणाली.

आम्ही संकलन केंद्राकडे निघालो. ते एक मोठे गोदाम होते. तिथली मॅनेजर एक तिशीच्या आसपासची एक तरुण स्त्री होती, तिला आम्ही सांगितलं की आम्ही मुंबईहून तिथे आलो आहोत. जवळच महिला गटागटांमध्ये बसून त्यांचे उत्पादन जमा करत होत्या. त्यांनी त्यांचा कट्टा (बीडीचा पॅक) ट्रेमध्ये ठेवला होता. मी एक फोटो काढला. मी त्यांच्याशी संभाषण सुरू केले.

“तुम्ही किती कमावता?”

“महिना ४५०० ते ५००० रुपये”

“तुमची मुले काय करतात?”

“साहेब, माझी मुलगी दुबईत काम करते”

“आणि माझा मुलगा नुकताच एमसीए उत्तीर्ण झाला आहे”

“वाह!” त्यांना त्यांच्या मुलांचा अभिमान होता.

“तुम्हीही पदवीधर आहात का?” मी तरुण मॅनेजरला विचारले. आणि लगेच तिच्या डोळ्यांत पाणी आले. ते दिसू नये म्हणून तिने तोंड फिरवले. मूर्खासारखा प्रश्न विचारला, मी स्वतःशीच म्हणालो, अगदीच मूर्खासारखा प्रश्न!!

“दहावी इयत्ता, साहेब” तिने उत्तर दिले. मी माफी मागितली.

“माझी आई देखील बिडी बनवत असे” तिने सूचित केले की तिच्या शिक्षणासाठी पैसे खर्च करणे कठीण झाले असावे.

“मुलींचे शिक्षण मोफत आहे त्यामुळे बरेच लोक चांगले शिक्षण घेत आहेत” माझा गाईड म्हणाला. महिला मॅनेजरशी झालेल्या माझ्या संभाषणाची त्याला माहिती नव्हती.

“या महिला त्यांच्या पतीच्या उत्पन्नात भर घालतात, परंतु जर तो बेकार असेल किंवा व्यसनी असला तर भयंकर समस्या सुरू होतात”

“म्हणजे काय होते?”

“बीडी कंपनीकडून पैसे बँकेत भरले जातात. पण नवरा एटीएम कार्ड स्वतःकडेच ठेवतो. तो मनाप्रमाणे पैसे काढतो आणि ती महिला बीडी करीत राहते. एक प्रकारची गुलामीच म्हणाना.”

“काही महिला यातून मार्ग काढतात – त्या ‘बनावट’ बीडी उत्पादन करणाऱ्या कंपनीत काम करतात जी रोख पैसे देते. बँकेतील व्यवहारांना अडथळा आणून पैसे हातात मिळवण्याचा हा मार्ग आहे”

“अरेरे!”

“त्या मग गुलामांसारखे काम करतात, मालक तर त्यांचे शोषण करतोच आणि नवराही.”

लोकांना गुलाम बनवण्याची ही नवीनच पद्धत आहे. मी अलिकडेच एका एचआर मॅनेजरला भेटलो जो बिहारमध्ये एका खाण कंपनीत काम करत होता. तिथे किमान वेतन अंदाजे ८००० रुपये होते, परंतु खाण कामगारांना फक्त ४००० रुपये दिले जात होते. ज्या कामगार कंत्राटदाराने त्यांना काम दिले तो सर्व कामगारांचे एटीएम कार्ड काढून घेत असे; कंपनी कामगारांच्या बँक खात्यात किमान वेतन जमा करत असे, परंतु कामगार कंत्राटदार त्याच्या पन्नास टक्के वेतनातील कपात काढून घेत असे.

“हीच व्यवस्था आहे!” एचआर मॅनेजरने मला सांगितले. जर कामगारांनी विरोध केला तर त्यांना नोकरी मिळणार नाही, चार हजार रुपयांत काम करण्यासाठी नेहमीच कोणीतरी असते, म्हणून ते ४००० रुपयांवर समाधान मानतात, त्यांना माहित आहे की ते व्यवस्थेशी लढू शकत नाहीत!”

मला बीडी उद्योगात ‘व्यवस्थेशी लढू शकत नाही’ अशीच मानसिकता दिसली. पन्नास बीडी भरपाईशिवाय घेऊन जाण्याचा – म्हणजे ‘ढापण्याचा’ ‘गुल्ला कट्टा’ होता, ती तर चक्क एक चोरीच  आहे, आणि मग ‘चाट बीडी’ आहे ज्यामध्ये चांगल्या बीडी अनेकदा ‘नाकारल्या जातात’ आणि गुणवत्ता नियंत्रणाच्या नावाखाली पैसे दिले जात नाहीत. म्हणजे थोडक्यात असे की तुम्ही जितक्या बीडया बनवाल त्यापेक्षा कितीतरी कमी बीडया स्वीकारून त्यांचे पैसे दिले जातात. त्याविरुद्ध आवाज नाही. कारण तुम्ही ‘व्यवस्थेशी लढू शकत नाही’.

याचा परिणाम अपरिहार्य होतो – पैसे उधार घेणे आणि कर्जाच्या सापळ्यात अडकणे. साथीच्या काळात काही आत्महत्या झाल्याचे वृत्त आहे. सोलापूर आणि बिहारमध्ये जे घडते ते इतर राज्यांमध्ये आणि उद्योगांमध्येही घडत आहे. शोषण आणि कर्जाच्या सापळ्याचे दुष्टचक्र, आणि आत्महत्या.

आपल्याला माहित आहे त्याप्रमाणे त्यात सर्वात जास्त पीडित महिला आहेत. अरविंद श्रौती तीन प्रकारच्या कामगार गटांची नावे सांगतात. पहिल्या गटात कॅज्युअल कामगारांचा समावेश आहे, जे आपण रेल्वे स्टेशनवर पाहतो किंवा कंत्राटदार येऊन त्यांना कामावर घेऊन जाण्याची वाट पाहत असलेले काहीजण नाक्यावर दिसतात. ते औद्योगिक संघटनांच्या परिघाबाहेर आहेत. ते त्यांना ‘वंचित’ म्हणतात. म्हणजे त्यांना काहीही काम द्या ते कमीतकमी रोजगारात करतील. जे काम मिळेल ते हवे. म्हणजे ते शोषणासाठी उपलब्ध आहेत!

कामगारांचा दुसरा गट म्हणजे उद्योगात प्रवेश केलेले, तरीही त्यांचे शोषण केले जाते. प्रशिक्षणार्थी (सरकारी योजनांअंतर्गत ते वर्षानुवर्षे प्रशिक्षणार्थीच राहतात), कंत्राटी कामगार या श्रेणीत येतात. अरविंद त्यांना ‘शोषित’ म्हणतात.

आणि शेवटी, आपल्याकडे ‘कायमस्वरूपी’ कामगारांचा एक गट आहे (व्यवस्थापकांसह) जे शोषण पाहतात आणि त्याकडे काणाडोळा करतात. अरविंद त्यांना ‘संमिलित’ किंवा ‘शोषकांशी हातमिळवणी करणारे’ म्हणतात. ते त्यांच्या दुर्लक्ष करण्याच्या कृतींमुळे शोषणात भागीदार आहेत. आजच्या उद्योगाचे हे भयाण व जळजळीत वास्तव आहे.